विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision) २०२६
प्रश्न १. विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) म्हणजे काय व ते राबविण्याचा उद्देश काय आहे?
उत्तरः राज्यातील विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या दोषविरहीत व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरिक्षण होय. सन २००२-२००४ या कालावधीत देशात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण करण्यात आले होते. त्यानंतर वाढते शहरीकरण, नागरिकांचे स्थलांतरण, मतदारांचा मृत्यु, दुबार नावे इत्यादी कारणांमुळे मतदार याद्या नव्याने तयार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे पुर्ण देशामध्ये हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे.

प्रश्न २. हा कार्यक्रम कधी राबविला जाणार आहे?
उत्तर : भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार हा कार्यक्रम महाराष्ट्रात दि. ३० जून, २०२६ ते १९ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत निवडणूक आयोगाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer) दि. ३०.०६.२०२६ ते ०८.०८.२०२६ या कालावधीत मतदाराच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना प्रपत्र (Enumeration Form) भरुन घेणार आहेत. त्या नंतर दि. १७ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. दि. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर, २०२६ या कालावधीत सदर याद्यांच्या अनुषंगाने दावे व हरकती स्विकारण्यात येतील. दि. १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत नोटिसा देणे व त्याबाबतची कार्यवाही तसेच्प्रप्प्र दावे व हरकतींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल व दि. १९ ऑक्टोबर, २०२६ रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रश्न ३: गणना प्रपत्रामध्ये कोणती माहिती भरावयाची आहे?
उत्तरः गणना प्रपत्रामध्ये मतदाराची सध्याच्या मतदार यादीतील माहिती पहिल्या भागात नमूद असणार आहे. दुस-या भागात दोन कप्पे आहेत. मतदाराचे स्वतःचे नाव व अन्य तपशिल मागील SIR च्या यादीत सापडले असतील (स्वःजुळवणी किंवा self-mapping) तर ते पहिल्या कप्यात भरता येतील. मतदाराचे असे तपशिल नसतील तर त्याच्या आई-वडील / आजी-आजोबा यांचे मागील SIRच्या यादीतील तपशिल (नातेवाईकांशी जुळवणी किंवा progeny mapping) दुस-या कप्ण्प्यात भरता येतील. तिस-या भागात मतदाराची जन्म तारिख, मोबाईल क्र., आधार क्र. वडील/आई यांची नावे ईत्यादि माहिती भरावयाची आहे व प्रपत्राच्या शेवटी मतदाराने किंवा मतदाराच्या कुटुंबातील प्रौढ सदस्याने स्वाक्षरी करुन किंवा डाव्या हाताच्या आंगठ्याचा ठसा लावून सदर गणना प्रपत्र BLO कडे द्यावयाची आहे.
प्रश्न ४. देशामध्ये मागील विशेष सखोल पुनरिक्षण कधी घेण्यात आले होते?
उत्तरः देशामधील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात २००२ ते २००४ या कालावधीत विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आले होते.
प्रश्न ५. आताच्या पुनरिक्षण कार्यक्रमात मागील SIR ची माहिती का घेतली जात आहे?
उत्तरः संविधान व कायद्यातील तरतुदीनुसार भारताच्या कोणत्याही मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट होण्याकरिता संबंधित व्यक्ती भारताचा नागरीक असणे अनिवार्य आहे. सन २००२-२००४ या कालावधीत झालेल्या विशेष पुनरिक्षणामध्ये तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये नाव असणे ही बाब संबधित मतदाराचा जन्म १ जुलै १९८७ पुर्वी झाल्याचे दर्शविते, जी तारिख Citizenship Act मधिल पहिली cut-off date आहे.
प्रश्न ६. यामध्ये मतदारांकडुन काय अपेक्षित आहे?
उत्तरः सध्याच्या सुमारे ७६ टक्के मतदारांची मागील SIR मधील नावातील नोंदींशी जुळवणी करण्याची कार्यवाही यापूर्वीच करण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटीच्या वेळी संबंधित मतदाराला किंवा त्याच्या कुटुंबातील उपस्थित प्रौढ व्यक्तिला ही माहिती दाखवेल व संबंधित मतदाराने / कुटुंबातील व्यक्तिने माहिती बाबतची खातरजमा केल्यानंतर ती माहिती गणना प्रपत्रात नमूद करेल व संबंधित मतदार / व्यक्तीचे नाव व अन्य काही माहिती नमूद करुन गणना अर्जावर स्वाक्षरी घेईल. भरलेल्या अर्जाची एक प्रत मतदाराला देण्यात येईल.
प्रश्न ७: ज्या मतदारांची मागील SIR मधील नोंदीशी जुळवणी (Mapping) झालेली नसेल तर अशा प्रकरणी काय कार्यवाही अपेक्षित आहे?
उत्तरः मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अशा मतदाराला त्याच्या २००२ मधील निवासासंदर्भातीलमाहिती (उदा. राज्य, जिल्हा, मतदारसंघ किंवा तालुका) विचारेलव त्याआधारे भारत निवडणूक आयोगाच्या ECINet ॲपकिंवा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावरुन त्यांची मागील SIR मधील माहिती उपलब्ध करुन घेऊ शकेल. मतदार स्वतः सुध्दा BLO च्या घरभेटीच्या आधी ही माहिती वरील अॅप / संकेतस्थळावरुन संकलित करुन ठेऊ शकेल.
प्रश्न ८: BLO च्या घरभेटीच्या वेळी मतदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणतेही प्रौढ सदस्य घरी उपलब्ध नसतील तर अशा व्यक्तीचे गणना प्रपत्र कसे भरुन घेता येईल?
उत्तरः मतदार यादीमध्ये नमुद पत्त्यावर BLO भेट देईल. पहिल्या भेटीत संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याची भेट न झाल्यास किंवा सदर घर बंद अवस्थेत असल्यास BLO चा दुरध्वनी क्रमांक दर्शविणारे कागदपत्र (Document) घरात/दरवाजात सरकवून ठेवण्यात येईल. संबंधित मतदार त्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करुन सोयीस्कर वेळ कळवु शकेल, ज्यायोगे गणना प्रपत्र भरुन देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. तथापि, अशा प्रकारे प्रतिसाद न मिळाल्यास संबंधित BLO आणखी दोन वेळा घरी भेट देईल.
प्रश्न ९. तीन गृहभेटीच्या नंतरही मतदाराच्या अनुपस्थितीमुळे किंवा घर बंद असल्यामुळे गणना प्रपत्र भरुन घेता न आल्यास काय होईल?
उत्तरः अशा प्रकरणी अंतिम भेटीच्या वेळी मतदार अनुपस्थित (Absent) किंवा त्या ठिकाणावरुन स्थलांतरित झाल्याबाबत निदर्शनास आल्यास तशी कागदोपत्री नोंद ठेवण्यात येईल व गणना प्रपत्रावर नोंद घेण्यात येईल. अशा मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट होणार नाहीत.
प्रश्न १०: मृत व्यक्तीच्या गणना प्रपत्रावर काय कार्यवाही करण्यात येईल?
उत्तरः मतदार यादीतील सर्व मतदारांसाठी गणना प्रपत्र तयार होतील. गृहभेटीदरम्यान त्यापैकी ज्या मतदारांचे निधन झालेले असेल त्याबाबत संबंधित मतदाराच्या नातेवाईकांकडुन प्राप्त माहितीच्या आधारे नोंद घेण्यात येईल व सदर गणना प्रपत्र “Uncollected”या प्रवर्गात मृत या संज्ञेखाली जमा करुन ठेवण्यात येईल व सदर नाव मतदार यादीत समाविष्ट होणार नाही.
प्रश्न ११. एखाद्या मतदाराचे एकापेक्षा दोन ठिकाणी नाव नोंदविलेले असेल अशा मतदाराच्या गणना प्रपत्राबाबत काय काळजी घेण्यात येईल?
उत्तरः लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम १७ व १८ येथिल तरतुदीनुसार एखाद्या व्यक्तीला एका पेक्षा जास्त आपले नाव मतदार यादीत नोंदविता येत नाही. तसेच, याच अधिनियमाच्या कलम ३१ नुसार मतदार यादीच्या पुनरिक्षणाच्या अनुषंगाने तसेच मतदार यादीतील नोंदीच्या अनुषंगाने चुकीचे विधान किंवा घोषणा करणा-या व्यक्तीस एक वर्षापर्यंतचा कारावास किंवा / आणि दंड ही शिक्षा होऊ शकते. राज्यामध्ये ज्या मतदारांची एकापेक्षा जास्त ठिकाणी नावे असतील अशा नावांच्या नोंदी (photo-simillar entries) BLO कडे उपलब्ध करुन दिल्या आहेत. मतदार सध्या राहत असलेल्या ठिकाणचे गणना प्रपत्रच मतदाराने भरुन व सही करुन द्यावयाचे आहे. दुसऱ्या ठिकाणच्या गणना प्रपत्रावर Already Enrolled असे नमूद केले जाईल व त्यामुळे त्या ठिकाणी त्याचे समाविष्ट होणार नाही. एका पेक्षा जास्त ठिकाणी आपले गणना पत्र भरुन दिले जाणार नाही, याची दक्षता संबधित मतदाराने घेणे आवश्यक आहे.


Leave a Reply